Teacher Recruitment Scam : शिक्षण घोटाळा सूत्रधार निलेश वाघमारे गजाआड, 19 ऑगस्टपर्यंत कोठडी  File Photo
नागपूर

Teacher Recruitment Scam : शिक्षण घोटाळा सूत्रधार निलेश वाघमारे गजाआड, 19 ऑगस्टपर्यंत कोठडी

सायबर पोलिसांची कारवाई, घोटाळ्यात गडगंज संपत्ती जमवली असल्याची माहिती

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : गेले अनेक दिवस राज्यभर गाजणाऱ्या नागपूर विभागातील शिक्षण घोटाळा, बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भविष्य निर्वाह निधी पथकाचा अधीक्षक नीलेश वाघमारे याला अखेर चार महिन्यांनी गुरुवारी (दि.14) अटक करण्यात आली.

पोलिसांनी वाघमारेला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याकडे हजर केल्यावर १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुरुवारी धरमपेठेतील त्याच्या घरातून सायबर पोलिसांनी ही कारवाई केली. उच्च न्यायालयाने मंगळवारी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. वाघमारेने या घोटाळ्यात गडगंज संपत्ती जमवली असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात नीलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले.

नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. २०१९ ते २०२५ पर्यंत या माध्यमातून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता आधी नागपूर विभागासाठी व नंतर राज्यभरासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे हे विशेष. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली

बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकास मान्यता दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली. प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे तसेच, शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करता, बनावट शालार्थ आयडी प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्यांना वेतन अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये नीलेश वाघमारे दोषी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. आजवर या प्रकरणात शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. परंतु, वाघमारे गजाआड होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला जात होता.

जमवली माया, गोव्यामध्ये दोन ‘रिसॉर्ट’

निलेश वाघमारे यांनी वेतन अधिक्षक असताना गडगंज माया जमवल्याची माहिती आहे. गोवा येथील दोन ‘रिसॉर्ट’ही वाघमारे चालवत असल्याने तिथेही पोलिस मागावर होते. यासोबतच भूखंड व्यवसायात तो असल्याची माहिती आहे.

आणखी काही अधिकारी रडारवर

दरम्यान, संस्थाचालकांसह काही अधिकाऱ्यांच्या अटकेची लवकरच शक्यता आहे.गुरुवारी दुपारी तो धरमपेठेतील एका ठिकाणी असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांच्या पथकाने त्याला अटक केली. अनेक शिक्षण संस्थाचालकांनाही अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT