नागपूर : विद्येच्या उपयोगाला जो विवेक हवा तो विवेक प्रतितीतून येतो, यातून आचरण घडते व नवपिढीची निर्मिती होते. २१ व्या शतकात शिक्षकांना ही भूमिका प्रभावीपणे निभवावी लागेल. तंत्रज्ञानाचे जाळे व विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शिक्षकाचे महत्त्व कायम राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
सोमलवार शिक्षण संस्थेच्या ७० व्या संस्थापक दिनी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोमलवार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामदास सोमलवार होते. व्यासपीठावर सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश सोमलवार प्रामुख्याने उपस्थित होते. '२१ व्या शतकात शिक्षकांची भूमिका’ हा डॉ. मोहन भागवत यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी ते म्हणाले की, ज्ञानाला विवेक नसेल तर ते ज्ञान विक्षिप्त होते. म्हणून कुठूनही येणार्या ज्ञानाची पारख करणे, ही शाश्वत भूमिका आहे. विज्ञानाची गती कितीही वाढली तरी शिक्षकाचे महत्त्व कायम राहणार असून शिक्षकाचा पराजय करेल असा विद्यार्थी घडवावा. यशस्वी, सार्थक जीवन घडविण्याची भूमिका शिक्षकाने सदासर्वकाळ पार पाडावी. ज्ञानाचा उपयोग विवादाकरिता नव्हे तर कल्याणाकरिता आहे, हे शाळा व शिक्षकांनी कायम स्मरणात ठेवावे. आत्मविश्वास, माणुसकी व जबाबदारीची जाणीव शिक्षकांनी निर्माण करावी, असेही डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले.