नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समिती संचालित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजाला शिक्षणाचे दरवाजे उघडून देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा यशस्वीपणे जपला आहे. या महाविद्यालयाने आता समाज परिवर्तनाचे एक मोठे केंद्र म्हणून काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ते महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या आणि संधीच्या समानतेच्या विचारांचा वारसा या महाविद्यालयाने पुढे नेला आहे. केवळ ५ वर्गखोल्या आणि ३०० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ६ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई आणि सदानंद फुलझेले यांसारख्या महान व्यक्तींच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले."
डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करा : सरन्यायाधीश भूषण गवई
यावेळी बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "स्वतःचा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेऊन जाणे, हा बाबासाहेबांचा विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तींना हीच खरी आदरांजली ठरेल." त्यांनी १९८१ मधील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या आठवणींना उजाळा देत कवी सुरेश भट यांनी रचलेल्या भीम वंदनेने आपल्या भाषणाचा समारोप केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाविद्यालयाच्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. दीपा पाणेकर यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. विद्या चोरपगार यांनी सूत्रसंचालन केले.