नागपूर

मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या सावत्र बापाला दुहेरी फाशीची शिक्षा

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना फसवण्यासाठी एका विकृत सावत्र बापाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. ही घटना नोव्हेंबर २०२२ मध्ये नागपुरात घडली होती. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय क्र. ३ न्या. अर्चना राऊत यांनी संशयित आरोपीला मंगळवारी (दि.२१) दुहेरी फाशीची तसेच आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.

भादंवि कलम ३०२, पोक्सो आणि ३७६ अंतर्गत फाशीची शिक्षा तसेच कलम ३०७ जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच षडयंत्र आरोपाखाली त्याला आजीवन कारवासाची शिक्षा ठोठावली. या क्रूरकर्मा आरोपीने मुलीला एकदा विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली परत एक वर्ष शिक्षा सुनावली गेली. धक्कादायक म्हणजे, या बापाने क्राईम पेट्रोल मालिका पाहून हत्येचा कट रचला होता. कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. गुड्डू छोटेलाल रजक (वय ४०) असे या आरोपीचे नाव आहे.

सुरूवातीला मुलीने स्वत:ची जीवनयात्रा संपविले असल्याचे भासवण्यात आले.आरोपी गुड्डु रजकने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी कळमना पोलीस ठाण्यात मुलीने जीवन संपवण्याचा केल्याचा गुन्हा नोंदवला होता. पण पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर आले.बापाने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन मोठ्या मुलीला फाशी दिल्याचे उघड झाले होते. आरोपी गुड्डूची पहिली पत्नी आरती हिने विष पिऊन जीवन संपवले होते. त्यानंतर त्याने कौशल्या पिपरडे या महिलेसोबत लग्न केलं. आरोपीने मृत मुलीला घटनेच्या आधी १० ते १५ दिवसांपूर्वी पिष पाजून मारण्याचा प्रयत्न केला होता. तिला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचा जीव वाचला होता. त्यावेळी तिने आपल्या नातेवाईकांकडे सावत्र आई त्रास देत असल्याचं सांगितलं होतं.

एवढंच नाहीतर सावत्र आईचा भाऊ संतोष पिपरडे हा छेडखानी करतो, अश्लील चाळे करतो, त्यामुळे तिने मावशीला फोन करून जीवन संपवत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आरोपी गुड्डूने मुलींना सावत्र आई आणि तिचे नातेवाईक त्रास देतात म्हणून त्यांना अद्दल घडविण्यासाठी मोठ्या मुलीला फाशी देत तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. आरोपी गुड्डूने सावत्र आई, मामा आणि मामी आपल्याला त्रास देत असल्यामुळे जीवन संपवत असल्याची सुसाईट नोट मुलीकडून लिहून घेतली होती. त्यानंतर मोठ्या मुलीला आत्महत्या करण्याचा देखावा कर असं सांगितलं आणि लहान मुलीला फोटो काढण्याचे सांगितले. आरोपी गुड्डू रजक याने स्वतःच्या मुलीसोबत शरीर संबंध करून तिला फास लावला होता.

घरात सर्वजण झोपी गेल्यानंतर आरोपी गुड्डूने देवघरामध्ये मुलीला स्टूलावर उभं केले होते. सिलिंगला दोरी बांधली आणि फास तिच्या गळ्यात लटकवला. लहान मुलीला फोटो काढण्यास सांगितलं आणि तेवढ्यात त्याने स्टुलाला लाथ मारली. गळ्याला फास बसल्यामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आरोपी बापाच्या मोबाईलचे पोलिसांनी बारकाईने विश्लेषण केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT