Divya Deshmukh
नागपूर : राजेंद्र उट्टलवार
नागपूरकर दिव्या देशमुख बुद्धिबळाची राणी झाल्याचा आनंद नागपूर विदर्भालाच नव्हे तर देशभराला झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी दिव्या आणि तिच्या कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. नागपुरातील तिच्या घरी ती परतल्यावर पुन्हा सेलिब्रेशन होणार आहे. दिव्याने सुवर्ण, तर कोनेरू हम्पी या भारतीय प्रतिस्पर्धी खेळाडूने रजतपदक मिळविले आहे. हा किताब जिंकणारी दिव्या भारताची चौथी महिला ठरली आहे.
विशेष म्हणजे एकही नॉर्म पदरी नसताना आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या ग्रेट ग्रँड मास्टर झाली आहे. अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. कष्ट सार्थकी लागले, अशी भावना व्यक्त करीत तिने डॉ, नम्रता देशमुख या आपल्या आईला आलिंगन दिले. दोघींनाही अश्रू आवरले नाहीत. त्या सतत काळजी घेण्यासाठी तिच्यासोबत असतात. खरेतर दिव्या बॅडमिंटनपटू व्हावी, असे घरी वाटायचे पण उंची कमी असल्याने दिव्याने अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक असलेले वडील डॉ. जितेंद्र देशमुख यांना देखील यात रुची होती. दिव्याने कधीही जिंकल्याचा आनंद उड्या मारून किंवा हरल्याचे दुःख रडून व्यक्त केले नाही. संयमाने परिस्थितीला सामोरे जाणे हा तिचा स्थायी स्वभाव आहे. खेळ आणि अभ्यास या दोघांमध्ये संतुलन साधले, अशी भावना दिव्या शिकलेल्या भारतीय विद्या भवनच्या तत्कालीन मुख्याध्यापिका अंजू भूतानी यांनी बोलून दाखविली. दिव्याने विजेतेपद मिळविताच नागपुरातील शंकर नगर येथील निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींनी गर्दी केली. मात्र यावेळी घरी आजी डॉ. कमल आणि काकू डॉ. स्मिता देशमुख होते. वडील डॉ. जितेंद्र देशमुख काही वेळातच घरी परतले. हा भारतासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. दिव्याचे पालक म्हणून आम्हाला खूप आनंद झाला, या शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. दुसरीकडे दिव्यावर कधीही या स्पर्धेचे दडपण नव्हते, अले तिच्या यशाचे गमक प्रशिक्षक श्यामसुंदर यांनी सांगितले.
दिव्या मुळची अमरावतीच्या धामणगाव (काटपुर) ता. मोर्शी, जि. अमरावती येथील आहे. तिचे आजोबा अमरावती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डाॅ के. जी. देशमुख व्हिआरसीइ काॅलेज नागपूर येथे प्रोफेसर असल्यामुळे येथेच स्थायिक झाले. काही काळ ते एमपीएससीचे अध्यक्ष होते. त्यांचे चिरंजीव डाॅ. जितेंद्र देशमुख यांची ती मुलगी आहे. दिव्या मोठी कामगिरी करेलच, असे मला 2018 साली पहिल्यांदा जाणवले. वयाच्या 19 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात दिव्याने विश्वविजेतेपद पटकावले आणि हा अंदाज खरा ठरला असे ज्येष्ठ बुद्धिबक शिक्षक अनुप देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडून दिव्या देशमुखला 11 लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, याची घोषणा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फुके यांनी केली. तिच्या यशामुळे अनेक तरुण, तरुणी बुद्धिबळाकडे वळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.