नागपूर

‘दीक्षाभूमी होणार जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान’

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  नागपूरच्या दीक्षाभूमीवर 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी 200 कोटींच्या विकासकामांचे ई-भूमिपूजन पार पडले. दीक्षाभूमी जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान करण्याचा संकल्प यावेळी हजारोंच्या जनसागरापुढे करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देत तर केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शुभ कार्याची मुहूर्तमेढ रोवली.

या विकास कामासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या 22.80 एकर परिसराचा विकास जागतिक दर्जाचा करण्यात येणार आहे. राज्य शासनातर्फे 70 कोटी रुपयांच्या धनदेशाचे वितरणही करण्यात आले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्रमुख पाहुणे डॉ. आफिनिता चाई चाना, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दीक्षाभूमी व चैत्यभूमीवरील विकास कार्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सर्व कामे जागतिक मानांकनाची व गतीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ शुभेच्छा संदेशात स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगातील बौद्ध धर्माचे विचारक ज्यावेळी या ठिकाणी महामानवापुढे नतमस्तक व्हायला येतील त्यावेळी त्यांना या ठिकाणाच्या सोयीसुविधा जागतिक दर्जाच्या मिळतील. दीक्षाभूमीचा विकास हा माझ्यासाठी भावनिक विषय आहे. दीक्षाभूमी माझ्या मतदारसंघात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दीक्षाभूमीवर जमलेल्या अथांग भीमसागराला अभिवादन करताना देश पातळीवर बुद्धिस्ट सर्किट पूर्ण केल्याचा आपल्याला आनंद असल्याबद्दल आणि या कार्याला देशभरातून दिल्या गेलेल्या कौतुकाच्या पावतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

SCROLL FOR NEXT