नागपूर: राज्याचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कृषी साहित्य खरेदी आणि वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. इतकेच नव्हे, तर ही याचिका तथ्यहीन असल्याचे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नागपूरमधील पडगिलवार ॲग्रो एजन्सीजचे संचालक तुषार पडगिलवार यांनी काही शेतकऱ्यांच्या वतीने ही याचिका दाखल केली होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदीची संपूर्ण प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाच्या रीतसर मान्यतेनेच पार पाडली होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे या निर्णयात कोणताही गैरप्रकार नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका रद्दबातल ठरवली. या निर्णयामुळे मुंडे यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागात सुमारे २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता, तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही जवळपास २४५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांना राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या मोठा दिलासा मिळाला आहे.