Devendra Fadnavis on Maharashtra Cabinet Reshuffle
नागपूर : मंत्री माणिकराव कोकाटे यांना भर विधानसभेत खेळलेला रमीचा खेळ अंगलट आला. त्यांच्याकडील कृषी खाते काढून दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आले. दरम्यान, मंत्रीपद पुन्हा मिळवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी लॉबिंग केल्याची माहिती पुढे आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे.
''जी घटना घडली त्या संदर्भात मोठा रोष होता. त्या संदर्भात अजितदादा, एकनाथ शिंदे यांच्याशी मिळून चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकाटे यांचे खाते बदलले आहे. त्यांना दुसरे खाते देण्यात आले आहे. आता कृषी खात मामा भरणे यांना देण्यात आला आहे. आता तरी कुठला दुसरा बदल होईल? अशी कोणतीही चर्चा नाही.'' असे फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी तीन वेळा माझी भेट घेतली आहे. ती वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या पातळीवर होत नाही. माझी मंत्रिमंडळाबाबतची चर्चा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर होते.
आता या प्रकारे कोणीही बेशिस्त वर्तणूक करेल, तर त्यांना सर्वांना आम्ही तिघांनी सांगितलं आहे की आम्ही हे खपवून घेणार नाही, कारवाई केली जाईल. सर्वांसाठी हे संकेत आहेत. जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत. मात्र त्यावेळेस आपण काय बोलतो, कसं वागतो, आमचा व्यवहार कसा आहे?, हे सर्व जनता पाहत असते. त्यामुळे त्यावर अंकुश राहिलाच पाहिजे, असा इशारा फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''मालेगावच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने हिंदू आतंकवाद अथवा भगवा आतंकवाद असा प्रकारचा नरेटिव्ह तयार केला होता. तो आता पूर्णपणे बस्ट झाला आहे,'' असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, १९९० च्या दशकाच्या शेवटी २००० च्या सुरुवातीच्या वर्षात संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी घटना घडल्या. अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते. त्यामुळे इस्लामिक दहशतवाद असा नरेटिव्ह जगभर निर्माण झाला होता, तो काही भारताने निर्माण केलेला नव्हता. मात्र या नरेटीव्हचा आपल्या व्होट बँकेवर विपरीत परिणाम होत आहे, हे काँग्रेसच्या लक्षात आलं. सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं गेलं नव्हतं. तरीदेखील सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरिता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं, यूपीएने हे षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद असा शब्द निर्माण करून अनेकांना अटक केली गेली. एका यंत्रणेवर दबाव आणून हिंदुत्ववादी संघटना खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे भगवा आतंकवादामध्ये सामील आहेत अशा पद्धतीचे षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहत. त्यानंतर पुराव्याअभावीसुद्धा कारवाई करा असा दबाव पोलीस यंत्रणेवर होता. पोलीस यंत्रणेतील अनेक अधिकारी त्या दबावाला बळी पडले नाहीत. त्यामुळे पुढची कारवाई होऊ शकली नाही. अन्यथा हा खूप खोल रूतलेला षड्यंत्र होता. आता त्याचा पदार्फाश झाला आहे. हळूहळू यातील सर्व घटना बाहेर येतील आणि त्या वेळच्या भारतातील आणि राज्यातील सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवून हिंदू संघटनांना संपवण्याकरता, त्यांच्यावर बंदी घालण्याकरिता एक प्रयत्न उभा केला होता हेच त्याच्यातून समोर आलं आहे.
मालेगाव खटल्याच्या निकालावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केला आहे. हा खटला जाणुनबुजून कमकुवत करण्यात आला. जेणेकरुन आरोपी सुटतील, असे म्हणत चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ''आधी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगावं, कारण ज्या मनमोहन सिंi सरकारमध्ये ते होते आणि पीएमओ सांभाळत होते, त्याच सरकारने याला भगवा दहशतवाद म्हटलं होतं. तेव्हा आठवलं नाही की छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा आहे. भगवा असेल, हिंदू असेल किंवा सनातन असेल यांच्यात कुठलाही भेद नाही, हे सर्व एक आहे आणि हे सर्व राष्ट्र प्रेमी, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.