Cooking Gas Shortage Maharashtra
नागपूर : इंधन टंचाई नाही. केंद्र सरकार, ऑइल कंपन्यांनीही वेळोवेळी स्पष्ट केले आहे की एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नाही. मात्र काँग्रेसकडून जाणूनबुजून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
एखाद्या बँकेबद्दल अफवा पसरवली की, त्या बँकेत पैसे नाहीत, असे समजून लोक मोठ्या प्रमाणात पैसे काढायला धाव घेतात आणि त्यामुळेच संकट निर्माण होते. त्याचप्रमाणे एलपीजी संदर्भातही काँग्रेसने अशीच परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल करणे काँग्रेसने थांबवावे, असे फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
राहुल गांधी, नाना पटोले, विजय वडेटटीवार यांची विधाने गॅस टंचाईसाठी कारणीभूत आहेत. सध्या गॅसच्या टंचाईबाबत काही ठिकाणी चर्चा होत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील कोणत्याही चुकीमुळे गॅसची टंचाई निर्माण झालेली नाही. काँग्रेसकडून घबराट निर्माण केल्यामुळे गॅसच्या टंचाईसारखी परिस्थिती कृत्रिमरीत्या तयार झाली आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे की पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. आज जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासक नेता म्हणून पाहिले जाते. जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये समन्वय साधण्याची क्षमता मोदी यांच्यात असल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनीही नमूद केले आहे.
त्यामुळे देशातील काही नेत्यांनी विनाकारण वाद निर्माण करून देशाच्या नेतृत्वाची बदनामी करणे थांबवले पाहिजे. इराणच्या हार्मुज सामुद्रधुनीतून भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना परवानगी देण्याच्या संदर्भात अधिकृत भूमिका परराष्ट्र मंत्रालयाकडूनच मांडली जाईल. पण पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना कृतीतून उत्तर दिले आहे.