Raghuji Bhonsle Sword Nagpur
नागपूर : श्रीमंत राजे रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार लवकरच नागपुरात येणार आहे. तुम्ही तारीख ठरवा त्या तारखेला तलवार नागपुरात येईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांना दिला.
सिनियर भोसला पॅलेस येथे आयोजित राजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राजे मुधोजी भोसले यांनी याविषयीची मागणी केली होती. मध्यंतरी लंडन येथून लिलाव प्रक्रियेतून ही ऐतिहासिक भोसलेकालीन तलवार राज्य सरकारने भारतात परत आणली. ही तलवार नागपुरात राहिल्यास भावी पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल. भोसलेंच्या पराक्रमाची माहिती मिळेल अशी भावना मुधोजी राजे भोसले यांनी बोलून दाखविली होती.
कार्यक्रमाला मध्यप्रदेशच्या मंत्री संपत्तीया उईके,त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे गुरु माऊली अण्णासाहेब मोरे, राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ मुधोजी राजे भोसले उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सर्वश्री विजय साळवी, विजया मारोतकर, सागर कांबळे, डॉ संगीता राऊत, विनय शुक्ला, संदीप शिंदे, मधुरा मेहर, क्रीशा सोनी यांना राजरत्न पुरस्कार देण्यात आले.