CM Devendra Fadanvis : शेतातील विंधन विहिरींवरील बंदी 15 डिसेंबर पर्यंत शिथील!  
नागपूर

CM Devendra Fadanvis : शेतातील विंधन विहिरींवरील बंदी 15 डिसेंबर पर्यंत शिथील!

झाडे जगविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : सध्याची दुष्काळी स्थिती पाहता विशेष बाब म्हणून जिथे गरज आहे तिथे झाडे जगविण्यासाठी केवळ शेतीकामाकरीता विंधन विहिरींवरील बंदी येत्या 15 डिसेंबर पर्यंत उठविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी विविध ग्रामपंचायत सरपंचांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

     मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी या गावात मुक्काम करून येथेच दिवाळी साजरी केली. आज सकाळी पुढील दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यंदा दुष्काळामुळे जलसंकट असून, शेतातील पिके मातीमोल होण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विंधन विहिरींचे खोलीकरण किंवा नवीन विंधन विहिरी करणे यावरील बंदी उठविणे सरकारसाठी थोडे अडचणीचे आहे, मात्र विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना परवानगी घ्यावी लागेल तसेच बंदी उठविण्याचा निर्णय सरसकट नाही, झाडे जगविण्यासाठी आवश्यक तेथेच परवानगी असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी नागरिकांनी पाण्याची बचत तसेच पुनर्भरण करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

    या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे, मात्र पशू दवाखाने नाही, अशी व्यथा अनेक प्रतिनिधींनी मांडली. त्यावर गुरांच्या दवाखान्यांबाबत पाहणी करून लगेच निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

जलजीवन मिशनच्या कामांबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, पुरेसे पैसे न मिळाल्याने काही कामे अपूर्ण आहेत, मात्र आता ती प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. जेथील कामे 75 टक्यांच्यावर पूर्ण झाली आहेत, तेथे तातडीने निधी उपलब्ध करून ती कामे पूर्ण केली जातील. अन्य ठिकाणची कामेही टप्प्यात पूर्ण केली जातील, असे याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

     शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांकडून होत असलेले नुकसान गंभीर आहे. त्यासाठी तार कुंपण योजना अधिक व्यापक करण्यात येईल. जंगलाला लागून असलेल्या शेतांना यात विशेष प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यामधील गाळ काढून ती माती शेतीत टाकण्याची कामे हाती घेण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT