नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पवित्र दीक्षाभूमीची बदनामी आणि स्मारक समितीविरुद्ध कृत्य केल्याचा ठपका ठेवत स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत सुरेई ससाई यांनी सदस्य डॉ. राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांच्यावर अखेर कारवाई केली. या दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे ससाई यांनी जाहीर केले आहे.
दीक्षाभूमीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच जागतिक पातळीवर पोहोचले; असे असताना समितीचे सदस्य किंवा पदाधिकारी दीक्षाभूमीची बदनामी करणारे कृत्य करत असतील तर ते चुकीचे आहे, असा ठपका ठेवला. गवई यांना २९ जून, तर गजघाटे यांना ३० जून रोजी समितीचे अध्यक्ष या नात्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांत स्पष्टीकरण मागवण्यात आले; मात्र त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.
दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानानुसार अध्यक्षांचे कार्यकारी अधिकार संपूर्ण संस्था/समितीस बंधनकारक आहेत. संस्थेच्या संविधानातील कलम १३ (आय) नुसार पदावरून काढून टाकल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नियामक सदस्यत्वही समाप्त होते.
समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्यपदाचा वादही वाढला आहे. कार्यकारी प्राचार्या डॉ. दीपा पान्डेकर यांच्या जागी डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या ६ जुलै रोजी झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत विलास गजघाटे, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. कमलताई गवई, एन. आर. सुटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. डी. जी. दाभाडे आणि भदंत नागदीपंकर हे उपस्थित होते.