नागपूर : पुढारी वृत्तसेवा
उत्तर नागपुरातील कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाडा क्वार्टर चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या प्रॉपर्टी डीलर अंकुश रामाजी कडू (वय 52 वर्षे) यांची पूर्वनियोजित पद्धतीने घेरून हत्या करण्यात आली. शहरात गेले काही दिवस रोज हत्या सुरू असल्याने गृहमंत्र्यांच्या शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य माणूस व्यक्त करीत असून पोलिसांच्या एकंदरीत कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंकुश यांची ही हत्या भूखंडाच्या वादात सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचे बोलले जाते. अर्थातच फरार आरोपींना अटक झाल्यावरच या विषयीचा उलगडा होणार आहे. तेजबहादूरनगर येथील अंकुश कडू शनिवारी रात्री दुचाकीने घरी जात असताना म्हाडा क्वार्टर चौकात एका तरुणाने त्यांना अडवून वादविवाद सुरू केला. लागलीच ठरल्यानुसार इतर तीन तरुण घटनास्थळी आले. लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण तसेच सपासप चाकूने वार केले आणि पोटात चाकू सोडून आरोपी पसार झाले. कुणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
यानंतरही चौकात मृतदेह बराच वेळ पडून होता. माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टममसाठी मेयो रुग्णालयात पाठविला. विशेष म्हणजे भर चौकातील हत्येचा हा सर्व थरारक घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नागपुरात गुन्हेगारांची हिंमत वाढत चालल्याचे गेल्या चार दिवसातील चार हत्या, अपहरण अशा घटनांनी पुढे आले आहे.