नागपूर : आपण पराभूत झालो यावर अद्यापही विश्वास बसत नाही. निवडणूक मॅनेज केल्याची शंका आहे. याकरिता काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि आकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार मनीष गणगणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तिवसा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश वानखडे आणि आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना समन्स बजावला आहे. या आमदारांना तीन आठवड्यात आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात यशोमती ठाकूर या महिला व बाल कल्याणमंत्री होत्या. मोदी लाटेतही त्यांना भाजप पराभूत करू शकली नव्हती. २०२४ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा धक्कादायक पराभव झाला. राजेश वानखडे यांनी त्यांचा पराभव केला. मतदारांचा कौल बाजूने असताना पराभूत झालेल्या ठाकूर यांना निवडणुकीत काहीतरी गडबड झाल्याची शंका आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या जवळपास सर्वच पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. ईव्हीएमने निवडणूक घेण्याची अधिसूचना काढण्यात आली नव्हती, लोकसभेनंतर अचानक मतदार कसे वाढले, वाढीव मतदारांची मते महायुतीच्याच उमेदवारांना कशी काय पडलीत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या सोबतच उमेदवार असतानाही सीसीटीव्हीचे फुटेज दिल्या जात नाही, पैसे भरूनही व्हीव्हीपॅटची मोजणी केली जात नाही, असाही त्यांचा आक्षेप आहे. मनीष गणगणे हे वाशिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांचा महायुतीचे प्रकाश भारसाकळे यांनी पराभव केला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे आणि सत्तासुद्धा स्थापन केली आहे. उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुती सरकारने तीन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. असे असताना निवडणुकीच्या निकालावरची शंका अद्याप दूर झालेली नाही.