नागपूर : राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन येथे 8 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचे सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. कंत्राटदारांनी गतवर्षीचा व यावर्षीचा निम्मा निधी न मिळाल्याने पुकारलेले काम बंद आंदोलन समाधानकारक चर्चेनंतर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. सोमवारपासून (दि.२४) त्यांनी आपल्या कामाला वेग दिला आहे.
8 ते 19 डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा हंगाम बघता हे अधिवेशन आठवडाभराच होण्याची दाट शक्यता आहे. विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज येत्या 28 नोव्हेंबरपासून नागपूरला सुरू होत आहे.
अशा स्थितीत गतवर्षीच्या थकीत 150 कोटी यावर्षीचे 80 कोटी अशी किमान 50 टक्के निधी मिळावा, अशी मागणी कंत्राटदारांनी केली होती. मात्र, केवळ 20 कोटी रुपये देण्यात आले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मुख्य सचिव मनीषा पाटणकर यांनी पुढाकार घेतल्यानंतर यात मार्ग निघाला. आता कामे सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांनी दिली.
या आंदोलनामुळे नागपुरातील विधान भवन, रवी भवन, देवगिरी, हैदराबाद हाऊस, आमदार निवास व इतर ठिकाणी सर्व कामे खोळंबली होती. आता ही कामे झपाट्याने पुढे जातील, असे चित्र दिसत आहे. वेळेच्या आत ही कामे व्हावी, या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे यावर लक्ष असणार आहे.