Nagpur Municipal Corporation pothole protest
नागपूर: नागपूर शहरातील खड्डे, होणारे अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास यावर काँग्रेसने सोमवारी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केतन विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मनपा मुख्यालयासमोर “खड्ड्यांचे भव्य प्रदर्शन” लावले.
या प्रदर्शनात शहरातील प्रमुख रस्त्यांवरील तसेच अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे मोठ्या फ्लेक्सवर दर्शविण्यात आली. विशेष म्हणजे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांचे जीपीएस लोकेशनसह सप्रमाण पुरावे मनपा प्रशासनासमोर सादर केले. अशा प्रकारचे पुरावे प्रथमच सादर केल्याने या आंदोलनाची वैशिष्ट्यपूर्ण छाप उमटली.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी “नागपूर तुला एनएमसीवर भरोसा नाय का?” अशा विडंबनपर घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यांची दयनीय अवस्था आणि मनपा प्रशासनाची निष्क्रियता उपरोधिक शैलीत मांडण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना बॅरिकेडमागे रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी बॅरिकेटिंगवर चढून घोषणाबाजी केली. अखेर केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रतिनिधींनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आठ दिवसांत खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनपा आयुक्तांना दिला. हा प्रश्न गांभिर्याने घेतला नाही तर येत्या काळात मनपा अधिकार्यांचे फोटो खड्ड्यांमध्ये लावले जातील असेही ठणकावले.
या आंदोलनात स्नेहा निकोसे, भावना लोणारे, सरस्वती सलामे, प्रमोद ठाकूर, देवेंद्र रोटेले, शैलेश पांडे, अभिजीत झा, रिजवान रुमवी, रोहित यादव, वसिम खान, नितीन माहुरे, राजेश गोपाले, सत्यम सोडगीर, बंडू ठाकरे, श्याम सोनेकर, करुणा घरडे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.