नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अनंतराव घारड यांचे आज (दि.१९) दुपारी १२ वाजता निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांचे मागे पत्नी, मुली, जावई, नातवंड, मोठा आप्त परिवार आहे. गुरूवारी (दि. २०) सकाळी ९.३० वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अनंतराव यांनी राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांशी मैत्री केली, ती मनापासून जपली. नागपूर आणि विदर्भातील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक होते. आर्वी तालुक्यात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण ढगा येथे त्यांच्या मामाकडे झाले आईच्या स्वर्गवासानंतर वडिलांनी त्यांना आईच्या मायेने मोठे केले.
सिव्हील इंजिनिअर झाल्यानंतर काही काळ सरकारी नोकरी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे मन त्यात रमले नाही. धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना छात्र जागृती या विद्यार्थी संघटनेत त्यांनी काम केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
दुय्यम सेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून हजारो गोर गरीब विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले.माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचे घनिष्ठ कुटुंबिक संबंध असल्याने शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहले. मध्यंतरीच्या काळात नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त होते. नागपूर नागरी सहकारी रुग्णालयाचे ते अध्यक्ष होते.
अनंतराव घारड यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण व त्यांची कन्या आ. श्रीजया चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही आपली कौटुंबिक हानी असल्याचे म्हटले आहे.