नागपूर : काँग्रेसने नेहमी मतांचे लांगून चालन केले आहे. त्यांनी कधीच विकासाचे राजकारण केले नाही. नेहमी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करत त्याद्वारे सत्ता भोगली आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचा एवढा मोठा पराभव का झाला हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
कोराडी येथील निवासस्थानी रामटेक जिल्ह्यातील २२ सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना संघ समजायला खूप वेळ लागेल. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागेल. मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलावे एवढी त्यांची उंची नाही. ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आले नाही. कॉंग्रेसचा दोन समाजात दरी निर्माण करणारा पक्ष असा इतिहास राहिला आहे. संघाची भूमिका ही सर्वाना घेऊन चालणारी आहे.
काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी जरा समज ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेण्यापूर्वी त्यांनी विषय समजून घेतला पाहिजे. आम्ही माहिती घेतली अशा कुठल्याही नावाचा व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आमचे कुठलेच कार्यालय मदत करू शकत नाही. लोंढे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांची बालिशपणाची वर्तवणूक आहे.
उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल मांडलेले विचार योग्य आहे. या देशांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर ,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे आणि अनेक महापुरुषांबद्दल अपशब्द काढले जातात. हे सहन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे उदयनराजे यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबद्दल आमचे सरकार नक्की विचार करेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत कठोर कायदा करतील असेही बावनकुळे म्हणाले.