नागपूर : नागपूर शहरात मंगळवारी झालेल्या विक्रमी मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागपुरासह राज्यातील शहरांच्या जलनिस्सारण व्यवस्थेचे नव्याने नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राहुल गांधी, मराठा आरक्षण आणि पीक विमा यांसारख्या विविध मुद्द्यांवरही त्यांनी भूमिका मांडली.
मंगळवारी नागपुरात अवघ्या सव्वा तासात ११० मिमी, तर दिवसभरात तब्बल १८६ मिमी पावसाची नोंद झाली. एका दिवसात जवळपास पंधरा दिवसांच्या पावसाएवढा पाऊस झाल्याने शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे पाण्याचा निचरा प्रभावित झाला असला, तरी संपूर्ण शहरात तीच परिस्थिती नव्हती. नागपूरसारख्या शहरांतील जलनिस्सारण व्यवस्था मागील २० ते २५ वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीनुसार उभारण्यात आली आहे. मात्र, कमी वेळेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास कोणतीही यंत्रणा अपुरी पडू शकते. बदलत्या हवामानाचा परिणाम लक्षात घेऊन नागपुरासह राज्यातील शहरांच्या पायाभूत सुविधांचे आणि जलनिस्सारण व्यवस्थेचे नव्याने नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत, तरुणांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप करून अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने समाजासाठी अनेक निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांवरही सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पीक विमा योजनेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा स्वतःचा हिस्सा भरावा लागत असल्याने पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काही प्रमाणात घटल्याचे त्यांनी सांगितले.