नागपूर - लग्न आणि विघ्न सोबतच चालतात असे जुनेजाणते म्हणतात ते उगीच नाही. हळदीच्या रंगात आलेल्या कार्यक्रमात दारू पिल्यानंतर केलेली शिवीगाळ हाणामारीत परावर्तित झाली. या धावपळीत काव्यांश दुर्गेश पिल्ले वय 6 वर्षे, रा.हमालपुरा आणि त्याची मामेबहीण सानिया शिवराज पिल्ले वय 13 राहणार कामठी ही दोन लहान मुले गंभीर जखमी झाल्या. खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कामठीत सैलाब नगर येथे प्रणय बेलेकर याचे लग्ननिमित्त हळदीचा कार्यक्रम सुरू होता. अंजना नारायण स्वामी, दुर्गेश पिल्ले हे देखील यावेळी आले होते. जेवणानंतर परत जाताना त्यांच्याशी शिवीगाळ का करता, म्हणून झालेला वाद विकोपाला गेला. अमित राजू वाठोडे वय 33, अक्षय राजू वाठोडे 31 आणि शुभम रमेश गजभिये वय 28 यांनी काठीने दुर्गेशला मारहाण सुरू केली. एक महिलाही मारहाण करताना सोबत होती. काठीने काव्यांश आणि सानिया यांनाही तिघांनी मारहाण केल्याने त्यांना नागरिकांनी मध्यस्थी करीत गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. दुर्गेश यांच्या तक्रारीवरून तिघांना कामठी पोलिसांनी अटक केली आहे.