नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातील मुर्ती येथील देशभ्रतार कुटुंबियांना दहशतवाद्यांच्या त्या गाडीवर संशय आला होता. यासंदर्भात त्यांनी एका घोडे वाल्याला विचारणाही केली होती. मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी एकत्रित आले असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. सुरक्षा यंत्रणेचे हे मोठे अपयश असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे. माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यातील मूर्ती येथील देशभ्रतार व कोराडी येथील वाघमारे कुटुंबीयाशी संपर्क साधला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या वेळी हे दोन्ही कुटुंब काही अंतरावरच होते. सध्या ते श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षीत असून नागपूरला परतीच्या प्रतीक्षेत आहेत.
मुर्ती येथील प्रफुल्ल देशभ्रतार त्यांच्या पत्नी मेघा तसेच कोराडी येथील पुथ्वीराज वाघमारे त्यांच्या पत्नी मनिषा आणि मुली श्रेयषा व एकता हे श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. मंगळवारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते घटनास्थळाच्या काहीच अंतरावर होते. ज्या गाडीतुन हे दहशवादी आले होते त्या गाडीचा प्रफुल्ल यांना संशय आला होता आणि त्याने स्थानीक घोडेवाल्याकडे या विषयीची विचारणाही केल्याची माहिती त्यांनी अनिल देशमुख यांना सांगितली.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आम्ही श्रीनगर येथे हॉटेलला सुखरुप आलो. देशमुख यांनी दोन्ही कुटुंबीयांना हिम्मत दिली. देशभ्रतार आणि वाघमारे कुटुंबीयांना लवकरात लवकर नागपूरला आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशी विनंती त्यांनी केली.