नागपूर ः महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दहशतवादी कृत्यासाठीचा निधी (टेरर फंड) वापरला गेला असून राज्यातील निवडणुकीत विदेशी शक्तींनी हस्तक्षेप केला असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केले. या सर्व प्रकाराची विशेष तपास पथकाकडून (एटीएस) चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी विधानसभेत दिली.
भारत जोडो यात्रेत सक्रिय असलेल्या काही संघटना काठमांडू येथे झालेल्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या आणि या बैठकीत देशात ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याबाबत चर्चा करण्यात आली असा गंभीर व खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला. राज्याच्या निवडणूकीत विदेशी शक्तींनी हस्तक्षेप केल्याचे पुरावे सरकारकडे असल्याचे ते म्हणाले. दहशतवादी कारवायांसाठी देशभरात हजार कोटी पाठविण्यात आले. आपल्या खात्यात बेनामी पैसे जमा करण्यात आल्याचा आरोप मालेगांवच्या काही तरुणांनी केल्यानंतरच्या तपासात ही रक्कम 114 कोटी रुपये असल्याचे समोर आले. आरोपी सिराज मोहम्मदने 14 जणांचे आधार आणि पॅन कार्ड वापरून नाशिक मर्चंट कोआपरेटिव्ह बँकेच्या मालेगाव शाखेत 14 खाती उघडली व ही 114 कोटींची बेनामी रक्कम जमा केली, अशी माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
निवडणुकीच्या काळात भारत जोडो या नावाने कार्यक्रम घेणा-या 180 संघटनांपैकी 40 संघटना अशा आहेत ज्यांच्यावर अर्बन नक्षलवाद पसरविण्यासाठीच्या फ्रंटल संघटना म्हणून काम करीत असल्याचा उल्लेख 2012 साली तत्कालिन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला होता, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. 15 नोव्हेंबर 2024 ला काठमांडूला एक बैठक झाली, त्यात भारत जोडोची काही लोकं गेली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट फडणविस यांनी केला.