नागपूर : मे महिन्यात देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाची, देशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच न्या. भूषण गवई आज शुक्रवारपासून तीन दिवस विविध कार्यक्रम निमित्ताने नागपुरात आहेत. नागपूर, अमरावती पर्यायाने विदर्भाशी त्यांचे जवळचे नाते असल्याने या दौऱ्यात अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ ला येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न्या. गवई यांच्या हस्ते शनिवार 28 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. रविवारी नॅशनल लाँ युनिव्हर्सिटीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच जिल्हा वकील संघटनेच्या वतीने सत्कार होणार आहे.
दि. 28 जून रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण. दुपारी 4.30 वाजता उच्च न्यायालय येथील दुसऱ्या मजल्यावरील बार रूमचे उद्घाटन. सायंकाळी 6.30 वाजता रेशीम बाग येथील सुरेश भट सभागृहात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सत्कार समारंभ.
दि. 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता वारंगा बुटीबोरी येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन.