नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले वक्तव्य हे “मूर्खपणा, नीचपणा आणि नालायकपणाचे” असल्याची टीका करत भविष्यात अशा प्रकारची भाषा वापरल्यास भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
बावनकुळे बुधवारी (दि.२७) विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ही टीका अश्लील, नीच आणि नालायकपणाची आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली राजकीय उंची आणि आपण कोणाविरोधात बोलत आहोत, याचे भान ठेवावे.अशा वक्तव्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
गोवंश कत्तलीवर कडक कारवाई
दरम्यान,बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोवंश कत्तलीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. गोहत्या करणाऱ्यांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बाबत राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.