नागपूर - महायुतीतील वाचाळवीरांना पक्षांनी समज देण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील कामकाजाबाबत आरोप-प्रत्यारोप होत असतील, तर संबंधित पक्षांनी आपल्या वाचाळवीरांना समज देण्याची गरज आहे. एकमेकांवर आरोप करून किंवा तोंडसुख घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
नागपूरच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली
दरम्यान,नागपूरमधील पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे बावनकुळे यांनी पुन्हा स्पष्ट केले. “जिथे आम्ही हरतो, तिथे आम्ही शिकतो आणि त्या चुका सुधारून पुढील निवडणुकीत जिंकण्याचा प्रयत्न करतो, असे ते म्हणाले. विरोधी पक्षातील मतदारांकडून काँग्रेसला दुसऱ्या पसंतीची मते मिळतील, याची अपेक्षा होती आणि त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला, हे मान्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मात्र, पुढील निवडणुकीत आम्ही अधिक चांगल्या मताधिक्याने विजय मिळवू,” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
कोणी काय केले, हे नक्कीच समोर येईल....
पदवीधर निवडणुकीत दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सुमारे पाच हजार मतांचा मोठा आणि सातत्यपूर्ण ट्रेंड दिसून आल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. या बाबीची चौकशी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. एवढा मोठा ट्रेंड सातत्याने कसा राहू शकतो, याचा तपास होणे आवश्यक आहे. एका विशिष्ट पद्धतीने दुसऱ्या पसंतीची मते पडत असल्याचे दिसत असेल, तर त्यामागील बाबींची चौकशी झाली पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, “झोपेतून उठल्यापासून ते पुन्हा झोपेपर्यंत राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे ते नकारात्मक दृष्टीने पाहतात. आरोप करणाऱ्यांना रोखणे शक्य नाही.