नागपूर: वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (वेकोली) नागपूर येथील मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका बड्या अधिकाऱ्याच्या घरावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) छापा टाकून बेहिशेबी मालमत्तेचा मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत वेकोलीचे व्यवस्थापक संजय सिंग यांच्या घरातून तब्बल ७० लाख रुपयांची रोकड आणि ९०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कोळसा उत्पादन क्षेत्रातील अधिकारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, सीबीआयच्या पथकाने संजय सिंग यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर धाड टाकली. झडती दरम्यान अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने मिळून आले. जप्त केलेल्या ९०० ग्रॅम सोन्याची किंमत आजच्या बाजारभावानुसार लाखांच्या घरात आहे. उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ही मालमत्ता अधिक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी सीबीआयने व्यवस्थापक संजय सिंग आणि त्यांच्या पत्नी श्वेता सिंग या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ही संपत्ती जमवल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या दांपत्याने केवळ नागपुरातच नव्हे, तर इतरत्रही मालमत्ता खरेदी केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केवळ संजय सिंगच नव्हे, तर आता त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचीही चौकशी सीबीआयकडून सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या नावे असलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता, बँक खात्यांमधील व्यवहार आणि गुंतवणुकीची कागदपत्रे तपासली जात आहेत. ही संपत्ती जमवण्यासाठी आणखी कोणाचे साहाय्य लाभले का, याचाही शोध आता घेतला जात आहे.
वेकोली हे कोळसा क्षेत्रातील महत्त्वाचे मुख्यालय असून, येथील एका जबाबदार व्यवस्थापकावर अशा प्रकारे कारवाई झाल्याने इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या धाडसत्रामुळे वेकोली प्रशासनाच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.