मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात होणार आहे. File Photo
नागपूर

मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात

State Cabinet expansion : शपथविधी दुपारी चार वाजता; भाजपच्या यादीची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर ः राज्य मंत्रिमंडळाचा दीर्घ प्रतीक्षित विस्तार येत्या रविवारी (15 डिसेंबर) नागपूर येथे दुपारी चार वाजता होणार असून, त्यानंतर सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून आपापल्या मंत्र्यांची यादी तयार असली, तरी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीला दिल्लीतून हिरवा कंदील मिळालेला नसल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे समोर आले आहे.

महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी पार पडला. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुढील एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा अंदाज होता. तथापि, शपथविधीला आठवडा लोटला तरी संभाव्य विस्तार झाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या दिल्ली दौर्‍यात हा विस्तार 14 तारखेला म्हणजे शनिवारी होणार असल्याची माहिती दिली होती. तशी लगबगही राजभवनात सुरू झाली होती. तथापि, सूत्रांकडून नव्याने मिळालेल्या माहितीनुसार, आता हा विस्तार मुंबईत नव्हे, तर नागपुरात होणार आहे. नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा 15 डिसेंबरला दुपारी 4 वाजता राजभवन, नागपूर येथे होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळाचा विस्तार मुंबईऐवजी नागपुरात व तो शनिवारऐवजी रविवारी केला जाणार आहे. भाजपला 23, शिवसेना शिंदे गटाला 13 व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे मिळतील, असे समजते.

रविवारी पार पडणार्‍या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या 17, शिवसेनेच्या 10 आणि अजित पवार गटाच्या 7 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे, यावेळी गृह व अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अर्थ खाते अजित पवारांकडे होते, तर गृह खाते फडणवीस यांच्याकडे होते.

चाळीस बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना

हिवाळी अधिवेशनदेखील सुरू होणार आहे, त्यामुळे नागपूर येथे मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्याचे समजते. राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळात कोणाला संधी?

मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. त्यापैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची यादी तयार आहे. मात्र, भाजपच्या मंत्रिपदाच्या यादीला दिल्लीतील संसदीय मंडळाकडून अजून मंजुरी मिळालेली नाही. या कारणामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT