बंटी शेळके यांचा नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल  Pudhari Photo
नागपूर

बंटी शेळके यांचा नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल का?

Maharashtra Election Result | निकालानंतर काँग्रेसमधील अर्तंगत वाद चव्हाट्यावर

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आपल्याला उमेदवारी दिली मात्र आपला घात झाला. पक्षाचे चिन्ह असताना अपक्षा उमेदवार सारखी आपली अवस्था झाली. गेल्यावेळी 4 हजारात माझा पराभव झाला मात्र यावेळी मोठ्या मताधिक्याने मी हरलो. काँग्रेसचे संघटन माझ्या प्रचारात नव्हते, यामागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे मध्य नागपूरचे उमेदवार बंटी बाबा शेळके यांनी केला आहे.

प्रभारी सुखदेव पानसे, कुणाल चौधरी, राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांना सर्व घडामोडीची कल्पना होती. बोटांवर मोजण्याइतकेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते. नाना पटोले यांचे थेट संघाशी संबंध असल्याने त्यांनी इतरांशी भाजपची हात मिळवणी करून दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करत असल्याने त्यांना पक्षातून त्या संघटनेतच पाठवा अशी आक्रमक भूमिका पराभूत काँग्रेस उमेदवार बंटी बाबा शेळके यांनी उपस्थित केल्याने आज काँग्रेसमध्ये घमासान पाहायला मिळाले.

पराभवानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी अभय दिले असले तरी पटोले विरोधातील गट सक्रिय झाल्याचे दिसत आहे.दरम्यान ,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी लोकशाही वाचवण्यासाठी लढा देत आहे. ईव्हीएमवर माझा आक्षेप नाही तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नव्हती. निवडणूक आयोग पारदर्शकपणे वागला नाही असा आरोप केला. बंटी शेळके यांचे आरोप ही पक्षांतर्गत बाब असल्याने मी त्यावर नंतर बोलेल असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

भ्रष्टाचार, चुकीचा निर्णयबाबत बोला, घाबरू नका ...ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सूचना आहे त्यांच्या सूचनेनुसार मी वस्तुस्थिती मांडत आहे असे बंटी शेळके म्हणाले. निकालानंतर पक्षाच्या पराभवाची मंथन बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडल्यानंतर आजही माध्यमांशी बोलताना बंटी शेळके यांनी आपले दुःख सांगितले. नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना माझे काम न करण्याबाबत गेल्यावेळी देखील सूचना केली होती. यावेळी त्यांनी संभाव्य उमेदवार पॅनलमध्ये माझे नाव पाठवले नाही. बहुतांशी ब्लॉक अध्यक्ष माझ्या बाजूने नव्हते. दोन महिला अध्यक्ष माझ्या विरोधात नियुक्त करण्यात आले .कुणालाही पद हवे असल्यास मध्यमध्ये माझा विरोध करा अशी त्यांची भूमिका राहिली असा आरोप शेळके यांनी केला आहे.

प्रियंका गांधी यांच्या रोड शोच्या वेळी थेट संघ मुख्यालयाच्याजवळ असलेल्या बडकस चौकपर्यंत धडक देणारे बंटी शेळके आता या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रवीण दटके निवडून आल्यानंतर अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुथवरील अनागोंदी प्रकार,भाजपचा वेळोवेळी आपल्या बदनामीचा डाव यावरही त्यांनी आरोप केले. निवडणूक प्रचार काळात त्यांनी भाजपच्या कार्यालयात जाण्यापासून तर रिक्षा चालवित लक्ष वेधले. निवडणूक काळात काँग्रेस- भाजप कार्यकर्ते या मतदारसंघात अनेकदा समोरासमोर आले. मात्र,निवडून आल्यानंतर ते थेट प्रवीण दटके यांच्या दक्षिणामूर्ती चौक येथील घरी हार,पेढे घेऊन गेले. दटके- शेळके यांचे मनोमिलन देखील चर्चेत आले. आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच हल्लाबोल केल्याने शेळके पराभूत झाल्यानंतरही देशभरात चर्चेत आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT