Bogus teacher scam
नागपूर - बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती प्रकरणी महत्त्वाचा आरोपी असलेला गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील शिक्षक महेंद्र भाऊराव म्हैसकरने नागपुरातील सदर परिसरातील एका कॅफेमधून बनावट शिक्षकांचे 68 प्रस्ताव तयार केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच हे कॅफे येत असून त्यापैकी 13 जणांना भंडारा, गोंदिया जिल्ह्यात नोकरी मिळाल्याची माहिती आहे. सध्या म्हैसकर न्यायालयीन कोठडी अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात आहे. पोलीस तपासात दिलेल्या माहितीनुसार इतरांची धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी या कॅफेतील कम्प्युटरची तपासणी केली असता 68 शिक्षकांचे प्रस्ताव तयार करण्यात आले हे उघड झाले. यातील शिक्षकांना 2016 ते 2024 या कालावधीत नियुक्ती दिल्याचेही समोर आले. मात्र हे शिक्षक सध्या कार्यरत आहेत अथवा नाहीत याचा कागदोपत्री तपास सुरू आहे.
दरम्यान, नागपुरातील महेंद्रच्या आवळे नगर येथील घरी छापा टाकून पोलिसांनी ५३ उमेदवारांचे दस्तऐवज व 22 शिक्षकांचे प्रस्ताव जप्त केले. आता या सर्व दस्ताऐवजांची संख्या 143 वर गेली आहे. एकंदर 580 बनावट शालार्थ आयडीचा, नियुक्त्यांचा हा घोटाळा असून यात रोज नवी माहिती पुढे येत आहे.