नागपूर : नागपूर विभागात बोगस कागदपत्राच्या माध्यमातून 580 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्ती घोटाळा प्रकरणी आतापर्यंत शिक्षण उपसंचालकासह पाच अधिकारी,कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. तरीही नियुक्ती ते वेतन निश्चिती अशी ही मोठी साखळी असल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
लेखी व तोंडी तक्रारी येत आहेत. पोलीस तसेच सायबर पोलीस स्वतंत्रपणे याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार चौकशी करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिली. नागपूर विभागातच नव्हे तर राज्यातील एकूणच शिक्षण विभागात खळबळ माजवणाऱ्या या बोगस शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तपासात रोज प्रगती होत असून नागपूरच नव्हे तर पूर्व विदर्भ , इतर जिल्ह्यातील देखील तक्रारी येत आहेत. मात्र जोपर्यंत ठोस पुरावे हाती लागणार नाहीत तोवर काहीही सांगता येत नाही असा सावध पवित्रा घेतला.
दरम्यान, शिक्षक नियुक्ती प्रस्ताव संदर्भात महत्वाच्या असलेल्या 600 शालार्थ आयडी हॅक प्रकरणी जानेवारी महिन्यात तक्रार करण्यात आलेली आहे. याकडे लक्ष वेधले असता याविषयीची कबुली देताना ही तांत्रिक बाब असल्याने सायबर पोलीस सखोल तपास करीत आहेत असे मदने यांनी सांगितले. शिक्षक नसताना शिक्षक दाखविल्या प्रकरणी तक्रारीनुसार पोलिसांचा तपास आधीच सुरू झालेला आहे.
सुमारे 580 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे हे प्रकरण असून बोगस प्रस्ताव तयार करणे, बोगस स्वाक्षऱ्या करून नियुक्तीपत्र देणे तसेच जिल्हा परिषदमध्ये आवक, जावक रजिस्टरमध्येही हेराफेरी करण्याचे प्रकार उघडकीस आलेले असून ह्या संदर्भात सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले. दरम्यान एसआयटी मार्फत चौकशीची होत असलेली शिक्षक संघटनांची मागणी याकडे लक्ष वेधले असता त्यांनी बोलणे टाळले.