बावनकुळेंची हुकलेली संधी तर मिळाली, आता विजयाचे आव्हान?  File Photo
नागपूर

बावनकुळेंची हुकलेली संधी तर मिळाली, आता विजयाचे आव्हान?

Maharashtra Assembly Polls | आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापून बावनकुळेंना संधी

राजेंद्र उट्टलवार

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या सत्तेच्या लढाईत यावेळी एकेका जागेचे महत्त्व लक्षात घेता भाजपने जिंकेल त्यालाच तिकीट दिल्याचे पहिल्या यादीत उघड झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळी शेवटपर्यंत रखडलेले, हुकलेले तिकीट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना यावेळी पहिल्याच यादीत मिळाले. लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेले 17 हजारांवरचे मताधिक्य कापून त्यांना आता विजयाचे आव्हान पेलावे लागणार आहे.

विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापून बावनकुळे यांना देण्यात आले. गेल्यावेळी बावनकुळे यांचे तिकीट हायकमांडने कापले व सावरकर यांना दिले. त्याचा फटका भाजपला नागपूरसह विदर्भात बसला. मध्यंतरी लाडकी बहीण योजनासंदर्भात त्यांनी केलेले व व्हायरल झालेले विधान त्यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. भाजपच्या वतीने रविवारी पहिली यादी जाहीर झाली. कामठी मतदारसंघातुन पक्षाने गतवेळी तिकीट कापलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली.

आता विदर्भासोबतच राज्य सांभाळत त्यांना कामठीची जागा जिंकावी लागेल. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये या मतदारसंघात भाजपने बावनकुळेंऐवजी टेकचंद सावरकर यांना मैदानात उतरविले तर काँग्रेसने सुरेश भोयर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी सावरकर यांनी भोयर यांचा ११ हजार ११६ मतांनी पराभव केला. वंचितच्या उमेदवाराने १० हजारांवर तर एआयएमआयएमच्या उमेदवाराने ८३४५ इतकी निर्णायक मते घेतली, भाजपला याचा फायदा झाला.

लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करीत माजी मंत्री सुनील केदार समर्थक काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे खासदार झाले. बर्वेंना कामठी विधानसभेत १७ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली. आता या मतदारसंघातुन विधानसभेत जाण्यासाठी काँग्रेसचे माजी जीप अध्यक्ष सुरेश भोयर, जि.प.सभापती अवंतिका लेकुरवाळे व इतर जोमाने कामाला लागले. परंतु आता काँग्रेस उमेदवाराचा सामना थेट बावनकुळेंशी होणार असल्याने, त्यांना विधानसभा निवडणूक पाहिजे तितकी सोपी राहिलेली नाही हे तितकेच खरे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT