Maharashtra Municipal Elections 2026
नागपूर : भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी न मिळाल्याने काही पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असले तरी आमचा कार्यकर्ता पक्षाची भूमिका आणि निर्णय समजून घेतो आणि पक्षादेश मानून पुन्हा आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी कामाला लागतो. आम्ही नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून ज्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले ते लवकरच परत घेतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
मनपा निवडुकीत महायुतीत मोठ्या प्रमाणावर असंतोष, इच्छुकांची नाराजी बघायला मिळत आहे. उद्या नामांकन माघारीचा दिवस असल्याचे पार्श्वभूमीवर ते बोलत होते.पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल. निवडणुकानंतर चर्चा करायची गरज पडली तर चर्चा केली जाईल. अमरावतीत मी उद्या सकाळी दहा वाजता रवी राणा यांच्याकडे जाऊन चर्चा करणार आहे.त्यांनी जे उमेदवार उभे केले आहेL, ते परत घेण्याची त्यांना विनंती करणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षांवर झालेली कारवाई योग्य आहे. प्रदेशाध्यक्षांनी दिलेली यादी परस्पर बदलणे हे योग्य नाही त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांना काढून टाकले आहे. एखाद्या उमेदवारावर गुन्हा दाखल असेल, एफ आय आर मध्ये त्याचे नाव असू शकते पण गुन्हा सिद्ध झाला असेल तर त्याला उमेदवारी दिली जात नाही. सर्वच पक्षात गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली आहे. जेव्हा कोर्टाचा निर्णय लागेल तेव्हाच यावर बोलता येईल. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुती एकत्र लढण्याचा आमचा विचार आहे मात्र काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार अडचणी निर्माण होतात.जिल्हा परिषदेला आम्ही पुन्हा एकत्र बसून निर्णय करू,12 जिल्हा परिषदा ओबीसी आरक्षणाच्या आत आहे त्या निवडणुका लवकर जाहीर होतील. इतर निवडणुका 21 तारखेला होणाऱ्या कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असतील.
तिथली माहिती मी घेतली नाही. आशिष शेलार आणि अमित साटम त्यावर चर्चा करतील असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी स्वतः आणि स्टार प्रचारक प्रचार सभा घेतील.
आम्ही केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांना देखील विनंती केलेली आहे. नाशिक बडगुजर संदर्भात बोलताना यावर गिरीश महाजन, देवयानी फरांदे चर्चा करतील. चुकीचे झाले असेल तर तपासून स्थानिक पातळीवर योग्य निर्णय जाहीर केला जाईल.
दरम्यान, नागपुरात आमदार पुत्राने भाजपचा राजीनामा दिला याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले,भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा रोहित काही काळासाठी नाराज झाला असला तरी तो उत्तम कार्यकर्ता आहे. आमदारांच्या मुलगा हा काही गुन्हा नाही, आमदार खासदारांच्या मुलांनी निवडणूक न लढता सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली, भागवत कराड यांचा मुलगा तीन वेळा पक्षाचा महामंत्री आहे चांगला काम करतो अशी 40-45 युवकांची चांगली यादी जे आमदार, खासदारांचे मुलं आहेत कर्तुत्ववान आहेत पण पक्षाने निर्णय घेतला त्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही.
नागपुरात अपक्ष लढणाऱ्या कार्यकर्ता, नेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत.काही काळाकरिता कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसत असले तरी ते आमच्यासाठी नक्कीच काम करतील.मी स्वतः विनायक डेहनकर आणि माजी महापौर अर्चनाताई डेहनकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यातून मार्ग निघेल. जिथे भाजपचे उमेदवार लढत आहे तिथे पूर्ण क्षमतेने लढून 51% मत घेऊ. लोकांचा आमच्या पक्षावर,महायुतीवर विश्वास आहे.