नागपूर : एकीकडे राज्यभरात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. यानंतर आता भाजप मनपा निवडणूकीच्या तयारीला लागली आहे. आज सोमवारी (दि.२२) दुपारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी येथे नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार केला जात आहे.
यासोबतच आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती देखील स्पष्ट होणार आहे. शिंदे शिवसेनेने किमान 50 जागांची मागणी केली असल्याने नेमक्या किती जागा भाजप सोडणार याविषयी यावेळी चर्चा होणार आहे. रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी अशीच बैठक झाली. उबाठा गटापेक्षा शिंदे गट शिवसेना चांगली कामगिरी करीत आहे. हे लक्षात घेता शिंदेंना नाराज करून चालणार नाही त्यांना महायुतीत जागा द्यावी लागतील यावर पक्षात एक मत दिसत आहे.
नितीन गडकरी यांनी देखील महायुती एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे गेली पाहिजे यावर भर दिल्याची माहिती आहे. भाजपतर्फे मनपा निवडणूक इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच आटोपल्या. सहयोगी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सन्मानजनक वाटा मागितला असून स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी मनपा निवडणुकीच्या रणनितीच्या दृष्टीने या बैठकीला महत्व आले आहे. यात जागावाटप, संभाव्य उमेदवारांची यादी यावर प्राधान्याने चर्चा होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह या बैठकीत आमदार प्रवीण दटके, शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, संघटनमंत्री डॉ उपेंद्र कोठेकर प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.