Chandrashekhar Bawankule on Pravin Gaikwad attack  file photo
नागपूर

Chandrashekhar Bawankule : प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा कार्यकर्ता? बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

Pravin Gaikwad attack : प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा काटे याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मोहन कारंडे

Chandrashekhar Bawankule on Pravin Gaikwad attack

नागपूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेकीच्या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. शाईफेक करणारा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. या घटनेनंतर काटे याचे भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल होत असून विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यावर मंत्री बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळे काय म्हणाले? 

"प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही, असली कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही. गायकवाड यांच्या बद्दल झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी करावी. तो भाजपचा कार्यकर्ता आहे. परंतु, आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई झाली पाहिजे," असे बावनकुळे म्हणाले. दीपक काटे याचे बावनकुळे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. यावर बोलताना ते म्हणाले, "सुषमा अंधारेंना माहीत असायला पाहिजे की कार्यकर्ते मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात, पोलिसांनी योग्य कारवाई करायला पाहिजे."

गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे कोण आहे?

  • दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक असून भाजपचा पदाधिकारी देखील आहे. शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने काही आंदोलने केली आहेत.

  • चुलत भावाच्या खुन प्रकरणात काटे ७ वर्ष येरवडा जेलमध्ये होता.

  • २०२२ मध्ये बारामती येथे त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. २६ मार्च २०२३ रोजी इंदापूर तालुक्यात भाजपच्या शाखेचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केले.

  • २०२५ साली पुणे विमानतळावर बंदूक आणि जीवंत काडतूस सापडल्याने अटक करण्यात आली होती.

  • गेल्या काही महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडच्या नावाला शिवधर्म फाउंडेशनने विरोध केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असल्याचे मत शिवधर्म फाउंडेशनचे आहे.

  • दरम्यान, "दीपक काटे याने स्वतःच्या भावाची हत्या केली असून तो तुरुंगातही जाऊन आला आहे. त्याच्या आई-वडिलांनीही त्याला स्वीकारलेले नाही. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला भाजपने पद दिले," असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

त्यांना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत; ठाकरेंवर बावनकुळेंचा निशाणा

यावेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. "त्यांना आपले कार्यकर्ते आणि पक्ष सांभाळता येत नाही. कार्यकर्त्यांना भेटायला वेळ नाही, त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आपला नेता उपलब्ध नसेल तर कार्यकर्ता कोणाकडे जाणार? त्यांना कुठेतरी जावचं लागेल? भाजपचे आमदार कायम उपलब्ध असतात, म्हणून कार्यकर्ते भाजपकडे येत आहेत," असा टोला त्यांनी लगावला. अधिवेशानावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकार देत आहे. सभागृहात मांडलेल्या प्रश्नांचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शासनातर्फे समाधान केले आहे. या आठवड्यामध्ये जे काही प्रश्न मांडले त्याचही आम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ. महाराष्ट्राच्या सभागृहात काम करणाऱ्या विरोधकांनी विधायक काम करावे, आम्ही त्यांनी मांडलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊ."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT