राजेंद्र उट्टलवार
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका येथे खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व काँग्रेसची अभद्र युती पहायला मिळाल्याने अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस संतापली आहे. स्थानिक भाजपचे माजी आमदार टेकचंद सावरकर व काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आणि खासदार श्याम कुमार बर्वे यांनी पुढाकार घेत ही भ्रष्ट युती केली असा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर यांचा आरोप आहे.
या निवडणूक प्रक्रियेत भाजपची आमच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती होती मात्र निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक माजी आमदारानी अजित दादांच्या राष्ट्रवादीला धोका. विधानसभा निवडणुकीत राज्यात दारुण पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेसला पराभवाच्या भीतीपोटी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा साथ घ्यावा लागला. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमध्ये मात्र आम्ही सावध भूमिका घेऊ असा इशारा देतानाच स्थानिक माजी आमदार सावरकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने तातडीने कारवाई करावी ही मागणी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी आज या निकालानंतर केली आहे.
एकंदरीत मनपा निवडणुकीत महायुतीत भाजपकडे किमान 40 जागांची मागणी केल्याने शहरात ताणले गेलेले भाजप, राष्ट्रवादीचे संबंध आता ग्रामीणमध्येही ताणले जात असल्याची चिन्हे आहेत. ग्रामीणमध्ये केदार समर्थक अनेकांना भाजपने आधीच आपल्याकडे घेतले असताना आता थेट केदार आणि त्यांचे निष्ठावंत खासदार श्यामकुमार बर्वे यांच्याशी भाजपने या खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुका निमित्ताने वाढविलेली जवळीक, जिल्हा परिषदेत यापूर्वी सत्ता व ग्रामीणमध्ये असलेली पकड लक्षात घेता भविष्यातील राजकारणाची ही नांदी म्हणता येईल का ?