Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut
नागपूर : ठाकरे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत दररोज बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, हे सर्वांना माहिती आहे. ते कमी बोलले असते तर ठाकरे शिवसेनेचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जागा वाढल्या असत्या. मात्र, सततच्या बोलण्याने त्यांच्या जागा कमी होत असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२९ पर्यंत जनमत मिळाले आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षात कोणाला नेता मानायचे हे ठरविले पाहिजे. त्यांना भाजप आणि आमच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थ आहे, सक्षम आहेत. यापूर्वी अनेकांनी ८१-८२ वयापर्यंत काम केले आहे.
सभागृहात दाखविण्यात आलेला पेन ड्राईव्हमध्ये भाजप नेत्यांची नावे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी 'सामना' या दैनिकातून केला असला तरी या सर्व शिळ्या भाकऱ्या आहेत . मीडियामध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते बोलत असतात. त्यांनी २०२५ बाबत बोलले पाहिजे. २०१८ , १९, आणि २२ मध्ये काय घडले आहे, हे त्यांनी सांगितले पाहिजे. विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. मात्र, महाराष्ट्राच्या विकासासाठी चार गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगाव्यात. मात्र, केवळ विरोध करणे अशी मानसिकता असल्याचे बावनकुळे म्हणाले.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीनंतर सर्व समोर येईल, असे मत व्यक्त केले होते. आता कोकाटे स्वतः त्या संदर्भात बोलले. त्यामुळे त्या विषयावर काही बोलणे योग्य ठरणार नाही.
विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदाबाबत महाविकास आघाडीमध्ये प्रचंड वाद आहे, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद सुद्धा ते एकत्रित करू शकले नाही. त्यांनी वेगवेगळी पत्र परिषद घेतली, तिघेही आपापसात भांडत आहेत. एकनाथ खडसे यांनी आपली उंची कायम ठेवून आरोप लावले पाहिजेत. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल वैयक्तिक आरोप करून त्यांच्या जीवनाबद्दल संशय निर्माण करणे योग्य नाही. या पद्धतीचे राजकारण खडसेंनी सोडले पाहिजे.
गिरीश महाजन अत्यंत निष्कलंक नेते असून खडसेंनी आपली पत कमी करू नये. कोणीही कोणासोबत उभे राहून फोटो काढतो आणि त्या व्यक्तीने पुढे काही गुन्हा केला, तर त्यासाठी नेता कसा दोषी होऊ शकतो. लोढाचे विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत, आमदारांसोबत फोटो आहेत. फोटो पाहून संबंध जोडणे योग्य नाही. तुमच्यात धमक असेल तर तुमच्याकडे असलेल्या सीडी का दाखवत नाही? मीडियाने सुद्धा विकासासंदर्भात बोलले पाहिजे, असा सल्ला दिला.