Chandrashekhar Bawankule Pudhari
नागपूर

Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण म्हणजे ढोंगीपणा; बावनकुळेंची टीका

उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण हा केवळ ढोंगीपणा आहे. जनाधार कमी झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन मतांची बँक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

पुढारी वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray

नागपूर: उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण हा केवळ ढोंगीपणा आहे. जनाधार कमी झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन मतांची बँक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. विमानतळावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, जनाधार गेल्यावर आता त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. प्रभू श्रीराम आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसून आस्था, संस्कार आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण असतानाही उद्धव ठाकरे गेले नाहीत. जनाधार कमी झाल्यानंतर रामाचे नाव घेऊन मतांची बँक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचे संस्कार जपले

देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे सांगताना ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी आयुष्यभर हिंदुत्वाचे संस्कार जपले आहेत. बाबरी आंदोलनाच्या काळात ते कारसेवेत सहभागी होते, तर त्यावेळी टीका करणारे कुठे होते, हा प्रश्न आहे.

जयंत पाटील यांच्या भेटीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, राजकीय नेत्यांनी राज्याच्या विकासासाठी संवाद साधणे आवश्यक आहे. जयंत पाटील यांनीही अशीच भेट घेतली असून त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. सकारात्मक सूचना विरोधी पक्षाकडून आल्यास त्यावर सरकारने सकारात्मक विचार करणे हीच लोकशाहीत आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा मोठा उपक्रम

महसूल विभागाच्या आगामी निर्णयांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, 'राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना' लवकरच सुरू करण्यात येणार असून राज्यातील महिला बचत गटांना अडीच एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. या जमिनीवर बांबू लागवड केली जाणार असून शेतपाणंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा मोठा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी केला जाईल.

महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत

महायुतीत मतभेद असल्याच्या चर्चा फेटाळून लावताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये सातत्याने संवाद सुरू असून मतभेदांच्या बातम्या केवळ अफवा आहेत. महायुती विकासाच्या अजेंड्यावर एकत्रितपणे काम करत आहे. विरोधकांकडे सकारात्मक मुद्दे नसल्याने अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या साडी वाटप योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, काही कारणांमुळे एखाद्या वर्षी योजना थांबली असेल, मात्र ती पुन्हा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील.

ठाकरे बंधूंच्या संभाव्य संयुक्त आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रात जनाधार सकारात्मक कामातूनच निर्माण होतो. यावेळी त्यांनी महिला आरक्षण विधेयकावरही भाष्य करताना देशातील जनतेचा या विधेयकाला मोठा पाठिंबा असल्याचा दावा केला. काँग्रेसमधील अनेक खासदारही या विधेयकाच्या बाजूने भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT