नागपूर : काँग्रेसने कधीही ओबीसींना संविधानिक दर्जा दिला नसून विजय वडेट्टीवार केवळ ओबीसी समाजाच्या नावावर राजकारण करत असल्याचा पलटवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
ओबीसी सब-कमिटीच्या कामकाजावर वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतले होते. आज रविवारी समितीचे अध्यक्ष बावनकुळे यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच ते ओबीसी कॅबिनेट सब-कमिटीचे अध्यक्ष झाले. या समितीद्वारे १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार समाजाला न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचे काटेकोर मॉनिटरिंग केले जात आहे.
ओबीसी आरक्षणावर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी मंत्रालयातील सर्व योजनांचे पर्यवेक्षण केले जाईल, त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही.
महाज्योती प्रकरणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, विजय वडेट्टीवार मंत्री असताना त्यांच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार समोर आले असून ओबीसी समाजाच्या नावाखाली ते राजकारण करत आहेत. काँग्रेसने नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ओबीसी समाजाला न्याय दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्यापूर्वी आपली उंची तपासावी. “जनता विकासावर विश्वास ठेवते. काँग्रेसच्या नौटंकीला जनता कंटाळली असून भविष्यात त्यांना संधी मिळणे कठीण आहे.
” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचे समर्थन देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मोठेपणा जातीपातीच्या आधारावर नव्हे, तर कर्तृत्वावर ठरतो. विकसित भारत आणि महाराष्ट्रासाठी अशाच कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे.