नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मुलभूत सुविधांबाबत उशीर होत असल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सध्या पेट्रोल पंपाशेजारी २२ पैकी १६ ठिकाणी उपहारगृहे, प्रसाधनगृहे, वाहन दुरुस्ती केंद्रे, प्रथमोपचार, पार्किंग, पिण्याचे पाणी आदी प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा संदर्भात कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. ही कामे सुरू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. (Samruddhi Mahamarg)
कायमस्वरूपी मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्यामुळे सध्या १९ ठिकाणच्या पेट्रोल पंप संचालकांना तात्पुरत्या स्वरूपातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे महामंडळाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. गतिमान रस्ता पर्याय म्हणून लोकांची पसंती असलेल्या समृद्धी महामार्गावर मूलभूत सुविधा उपलब्धतेसाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्याला महामंडळाच्या प्रतिज्ञापत्रावर भूमिका मांडण्यासाठी येत्या ११ मार्चपर्यंत वेळ दिला.
अम्मे, मेरल, डवला, मांडवा, डव्हा, रेणकापूर, वायफळ, गणेशपूर, शिवनी व कडवांची येथील १६ ठिकाणी भूसंपादित जमिनीवर या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या त्यापैकी १३ ठिकाणी पेट्रोल पंप सुरू असून प्राथमिक स्वरूपाच्या मूलभूत सुविधाही आहेत. २०२० पासून कोव्हिडचा काळ आणि इतर विविध कारणांमुळे ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दरम्यान, ठाणे व नाशिक येथील सहा ठिकाणी पेट्रोल पंपांजवळ खासगी जमीन खरेदी करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दोन ठिकाणी जमिनीचे विक्रीपत्र झाले व जमीन मालकांसोबत लीज करारही करण्यात आल्याचे सांगितले.
वायफळ, विरुळ, धामनगाव, मालेगाव, सिंदखेड राजा, निधोना, वेरुळ, शिर्डी व भारवीर येथील इंटरचेंजमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर व नाशिक कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर तर, महामंडळातर्फे राज्याचे महाधिवक्ता वरिष्ठ ॲड. बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली.