Bageshwar Maharaj on Shivaji Maharaj Pudhari
नागपूर

Bageshwar Maharaj: ‘शिवराय थकले होते...’ बागेश्वर बाबाचे शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य; RSSच्या कार्याचंही केलं कौतुक

Bageshwar Maharaj on Shivaji Maharaj: धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील एक प्रसंग सांगितला. त्याने RSS च्या कार्याचंही कौतुक केलं.

पुढारी वृत्तसेवा

Bageshwar Maharaj on Shivaji Maharaj: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज याने नागपुरातील एका धार्मिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल सांगितलेल्या प्रसंगामुळे पुन्हा एकदा इतिहास, अध्यात्म आणि राष्ट्रवाद यांवर चर्चा रंगली आहे. नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा मंदिरा’च्या शिलान्यास भाषणादरम्यान बागेश्वर महाराजाने छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या नात्याविषयी एक प्रसंग सांगितला.

त्याच्या मते, सततच्या युद्धांनी आणि संघर्षांनी थकलेल्या शिवाजी महाराजांनी एकदा समर्थ रामदास स्वामींकडे जाऊन आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवला होता. “आता माझ्यात लढण्याची ताकद उरलेली नाही. हे राज्य तुम्ही सांभाळा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याचा उल्लेख बागेश्वर महाराजाने केला.

यानंतर त्याने सांगितलेल्या कथेनुसार, समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना विचारले, “तू कोण आहेस?” त्यावर शिवाजी महाराजांनी स्वतःला शिष्य म्हटले. मग समर्थांनी विचारले, “गुरुचे काम काय आणि शिष्याचे कर्तव्य काय?” त्यावर शिवरायांनी उत्तर दिले की, गुरु आज्ञा देतो आणि शिष्य ती पाळतो. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी तो मुकुट पुन्हा शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवत, “राज्य माझं असेल, पण ते चालवायचं काम तुम्ही करणार,” असं सांगितल्याचा दावा बागेश्वरने केला.

या कथेतून बागेश्वरने नेतृत्व, जबाबदारी आणि गुरु-शिष्य परंपरेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते, मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या व्यक्तीलाही कधीकधी मानसिक थकवा येतो. मात्र योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तो पुन्हा उभा राहू शकतो.

भाषणादरम्यान त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही वक्तव्य केले. भारतावर संकट आलं की संघाचे कार्यकर्ते लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे येतात, असे सांगत त्याने संघाच्या कार्याचं कौतुक केलं. “चार मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक मूल संघासाठी द्या,” असे विधान त्याने कार्यक्रमात केले.

दरम्यान, नागपुरात उभारण्यात येणारं भारतदुर्गा मंदिर हे भारतीय संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि अध्यात्म यांचं प्रतीक म्हणून विकसित केलं जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT