Bachchu Kadu Thackeray brothers alliance
नागपूर : राज्याची, मराठी माणसाची अस्मिता महत्वाची आहे. मात्र सर्वसामान्यांच्या पोटात भाकर नसेल तर तो जगणार कसा? शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे, असे आवाहन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केले.
अलीकडेच हिंदी सक्तीविरोधात मराठी भाषेसाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने आणि राज्य सरकारच्या भूमिकेमुळे यश मिळाल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ठाकरे बंधूंनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगासाठी एकत्रित यावे अशी भूमिका व्यक्त केली.
हिंदी सक्तीविरोधी आंदोलनासाठी ठाकरे बंधू एकत्रित आले तर यश मिळेल. आज मराठी शेतकरी, शेतमजुरांचा प्रश्न गंभीर आहे. जगण्याचा, पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
माय मराठीच्या हितासाठी उभे राहणाऱ्या ठाकरे बंधूंनी आता मायबाप शेतकऱ्यांच्या हक्कासाठीदेखील आमच्यासोबत आवाज उठवायला हवा! असेही बच्चू कडू यांनी नुकतेच म्हटले होते. असाच महाराष्ट्र एकवटला तर ही धरणीमाय न्यायाचा आनंद अनुभवू शकेल!, असे आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीसाठी २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.