नागपूर

Nagpur crime | अथर्वच्या अपहरण, हत्येचा उलगडा...! शेजाऱ्यासह तिघांना अटक

या हत्येनंतर परिसरात संतापाचे वातावरण, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद होती.

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी गिट्टीखदान परिसरातील शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या १४ वर्षाच्या अथर्व दिलीप ननोरे या मुलाच्या अपहरण, गळा दाबून हत्या आणि मृतदेह फेकून दिल्या प्रकरणी अखेर आज सोमवारी तीन आरोपींना अटक करण्यात आली.

तिघेही भाजी विक्रीचा व्यवसाय करतात यातील एक जण शेजारी असल्याची माहिती आहे. ठोक भाजी व्यवसाय असलेल्या अथर्वच्या वडिलांकडून पैसे उकळण्याचा त्यांचा डाव होता. परिसरातील सीसीटीव्हीत दिसलेल्या एका संशयास्पद फिरणाऱ्या चार चाकी वाहनामुळे अथर्वच्या हत्येचा उलगडा झाला. कळमेश्वरच्या भरतवाडा येथील एका पुलाच्या फुटपाथवर रक्तबंबाळ अवस्थेत भाजीपाल्याच्या पोत्यात छिन्नविछिन्न व कोंबलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला होता. कापडाने गळा आवळून हत्या केल्यानंतर त्याचे हात-पाय बांधून त्याला फेकून दिले होते. गीट्टीखदान आणि गुन्हे शाखा पोलिसांनी हा छडा लावला. या हत्येनंतर परिसरात संतापाचे वातावरण, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद होती.

२ एप्रिल रोजी शोभायात्रेत आइस्क्रीम घेण्यासाठी अथर्व त्याच्या काही मित्रांसोबत गेला. होता. रात्री ११ वाजले तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे ननोरे कुटुंबीयांसह परिसरातील नागरीकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे अथर्वची आई रेवती दिलीप ननोरे (वय ४४, रा. माहोरे पेट्रोलपंपाच्या मागे, गिट्टीखदान) यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यावरून गिट्टीखदानचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप इंगळे यांनी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेची अनेक पथके मुलाचा शोध घेत होती.

अथर्वचे वडिल दिलीप ननोरे यांचा भाजीपाला व आलुकांदे विक्रीचा ठोक व्यवसाय आहे. माहोरे पेट्रोलपंपाच्या बाजुलाच त्यांचे भाजीचे दुकान आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यात अथर्व हा लहान आहे. या आरोपींचा देखील भाजी विक्रीचा व्यवसाय असून अथर्वच्या अपहरणनंतर वडिलांकडून खंडणीचा त्यांचा डाव होता. मात्र, गिट्टीखदान परिसरात वातावरण चिघळल्याने घाबरून त्यांनी त्याची हत्या केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT