प्रातिनिधिक छायाचित्र  File News
नागपूर

विधानसभा निवडणूक निकालाविरोधात काँग्रेसपाठोपाठ भाजप उमेदवारही न्यायालयात

Maharashtra Assembly Election Results | विदर्भातील पराभूत भाजप उमेदवारांच्या याचिका

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या उमेदवारापाठोपाठ आता विदर्भातील पराभूत भाजप उमेदवारही न्यायालयात गेले आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विजयी उमेदवार साजिद खान पठाण यांच्याविरोधात भाजप उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. खान यांनी गैरमार्गाने विजय मिळविल्याने त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे. (Maharashtra Assembly Election Results)

काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांचा 1 हजार 283 मतांनी विजय झाला. अनेक बुधवर डबल मतदान झाले. मतदार यादीत एकाच मतदाराचे नाव डबल होते, असा दावा अग्रवाल यांनी केला आहे. अग्रवाल यांच्यातर्फे अॅड. मालवीय, अॅड. हरीश ठाकूर यांनी बाजू मांडली. दरम्यान, ब्रह्मपुरी येथील काँग्रेसचे विजयी उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध पराभूत उमेदवार परिवर्तन आघाडीचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी शनिवारी दाखल केली. (Maharashtra Assembly Election Results)

त्यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यासह आठ उमेदवारांनी याचिका दाखल केली. सोमवारी तुमसर येथील आमदार राजू कारेमोरे यांच्या विरुद्ध शरद पवार गट राष्ट्रवादीचे चरण वाघमारे यांनी याचिका दाखल केली. निवडणुकीत ईव्हीएमबाबत निकष पाळण्यात न आल्याचे तसेच अन्य गैरव्यवहार झाल्याचे दावे या सगळ्यांनी केले आहेत. आता या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काटोल विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार सलील देशमुख यांनीही याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबतच हिंगणा मतदारसंघातील माजी मंत्री रमेशचंद्र बंग, अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघातील काँग्रेस उमेदवार ॲड. महेश गणगणे, बुलढाणा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गट उमेदवार जयश्री शेळके यांनी देखील याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या उमेदवारांच्या याचिका दाखल होणार आहेत. (Maharashtra Assembly Election Results)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT