नागपूर: महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या नेते-पदाधिकारी पळवापळवीच्या पार्श्वभूमीवर, "कोणत्याही पक्षाने एकमेकांची मने दुखावतील अशी कृती करू नये," असा परखड सल्ला शिवसेना नेते आणि राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल यांनी दिला आहे. जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असून, सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन करत त्यांनी महायुतीतील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आणली.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना ॲड. जैस्वाल यांनी महायुतीच्या अंतर्गत राजकारणावर थेट भाष्य केले. ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करताना कोणीही असे कृत्य करू नये, ज्यामुळे मित्रपक्षांमध्ये कटुता निर्माण होईल." त्यांचा हा रोख मित्रपक्षांकडून होणाऱ्या नेते फोडाफोडीकडे असल्याचे स्पष्ट दिसत होते.
जैस्वाल यांनी इतर राजकीय मुद्द्यांवरही आपली मते मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केल्यावर जैस्वाल म्हणाले, "प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. अशा मागणीत काहीही गैर नाही." भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे, या उदय सामंत यांच्या मागणीला जैस्वाल यांनी पाठिंबा दिला. "गोगावले हे ज्येष्ठ आमदार असून, संबंधित जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यामुळे त्यांची मागणी योग्य असून आमचा तिला पाठिंबा आहे," असे ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, "ओबीसी मंत्रालय कोणी स्थापन केले, आरक्षण कोणी घालवले आणि न्यायालयात योग्य बाजू मांडून ते कोणी परत मिळवून दिले, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत आहे."
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल विचारले असता, ॲड. जैस्वाल यांनी मिश्किल टिप्पणी केली. "अगोदर त्यांची युती तर होऊ द्या, त्यानंतर त्यावर बोलू. पण त्याआधी ते दोघे वेगळे का झाले होते, याचा अभ्यास करायला हवा," असा चिमटाही त्यांनी काढला.