नागपूरः येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन, डॅडी उर्फ अरुण गवळी याने संचित रजेसाठी (फर्लो) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायालयाने उपमहानिरीक्षक कारागृह पूर्व यांच्यासह गृह विभागाला नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर हा अर्ज चर्चेत आहे.
अखिल भारतीय सेना नावाने स्वतःचा पक्ष काढून अरुण गवळीने चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 2004 साली तो आमदार म्हणून निवडून आला होता. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसाडेकर यांच्या हत्याप्रकरणी अरुण गवळी सध्या कारागृहात आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती विनायक जोशी आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. गवळीने दाखल केलेला अर्ज कारागृह प्रशासनाने फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. यापूर्वी न्यायालयाने सप्टेंबर २०२३ मध्ये गवळीला २८ दिवसांची रजा दिली होती. नियमांचा उल्लंघन न केल्याचा दाखला देत गवळी यांच्यातर्फे ऍड मीर नगमान अली यांनी युक्तिवाद केला.