Andhashraddha Nirmulan Samiti
नागपूर : पैशाचा पाऊस पाडून दाखविण्याच्या नावावर नग्नपूजा करण्याच्या निमित्ताने एका भोंदू बाबाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीनेही आक्रमक पवित्रा घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे. रविवारी ही घटना मानकापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. मात्र, ती नंतर उघडकीस आली.
याप्रकरणी भोंदूबाबा अब्दुल कदीर उर्फ कदिलबाबा त्याचा सहकारी आशिष ,त्याची मैत्रीण आणि त्यांचे परिचित इतर दोघे अशा एकंदर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 25 एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या विकृत प्रकरणी महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस हरीश देशमुख यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी मात्र आरोपी आणि पीडित यांच्याविषयी कमालीची गोपनीयता बाळगली आहे.
अब्दुल कदीर उर्फ कदिलबाबा असे या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याने आपला मित्र आशिष व त्याची एक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी मैत्रीण यांच्या मदतीने ही नग्नपूजा आणि हा सर्व विकृत खेळ रविवारी मध्यरात्री मांडला. यासाठी त्यांनी तीन गरीब अल्पवयीन तरुणींना पैशाचे आमिष दाखवत यात सहभागी करून घेतले. तुम्ही केवळ कपडे काढून दाखवा, मी पैशाचा पाऊस पाडतो. अशा प्रकारची बतावणी त्याने केली.
मात्र, पूर्वनियोजित प्रकारातून या मुलींना पूजेच्या निमित्ताने कसले तरी गुंगीचे औषध देण्यात आल्याची माहिती पुढे आली असून या रात्रीच्या अत्याचार प्रकरणाची वाच्यता सकाळी या मुलींनी आपल्या एका मित्राजवळ केली असता त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले. तक्रारीवरून भोंदूबाबा व त्याचा सहकारी यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी काही व्हिडीओ रेकॉर्ड झालेत का, याचीही चौकशी आता सुरू केली असून या सामाजिक विकृतीचा वेळीच कठोर कारवाईतून बंदोबस्त केला जावा, अशी मागणी केली जात आहे.