आशिष देशमुख Pudhari File Photo
नागपूर

अनिल देशमुख यांचा तो पेनड्राईव्ह करप्ट! पुतण्याचा पलटवार

माजी आमदार डॉ आशीष देशमुख यांची टीका

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : वेगवेगळ्या रंगाचे शर्ट, कुर्ते व जॅकेट घालणारे फॅशनेबल अनिल देशमुख हे फॅशन म्हणूनच पेनड्राईव्ह दाखवत आहेत. आरोपादाखल दाखविलेल्या त्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काही नाही, किंबहुना तो करप्ट असल्याचा दावा देशमुख यांचे पुतणे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे. त्या पेनड्राईव्हमध्ये काही तथ्य असल्यास त्यांनी ते जनतेसमोर आणावे असे आव्हानही पुतण्याने काकांना दिले आहे.

मागे १३ महिने अनिल देशमुख हे कारागृहात होते. परिवारातील एक सदस्य म्हणून आम्हाला त्यांची चिंता आहे. काचेच्या घरात राहणारे दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करत नसतात. त्याचवेळी ईडी, सीबीआय, राज्य सरकारच्या आयोगासमोर त्यांनी हे तथ्य का नाही आणले? या बाबतीत त्यावेळी बोलण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक थांबविले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघ उपलब्ध नसताना जर ते असे खोटे आरोप करत असतील तर महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून विदर्भातील जनता यांना माफ करणार नाही असा इशारा दिला.

माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते अनिल देशमुख यांनी एक पेनड्राईव्ह माध्यमांशी बोलताना दाखवून राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्या आरोपांवर भाजपाचे प्रवक्ते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख बोलत होते. ते म्हणाले, परवाच आपण अशी बातमी ऐकली की, अनिल देशमुख यांचे पुत्र सलील हे काटोल येथून निवडणूक लढविणार आहेत. सर्वांचे लक्ष तिकडे गेल्यामुळे अनिल देशमुख यांनी त्यानिमित्ताने काही आरोप केले आहेत. नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ अनिल देशमुख यांच्यावर आलेली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या वाट्याला दक्षिण-पश्चिम नागपूरची जागा मिळणार, असे कळल्यामुळे ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघावर डोळा ठेऊन त्यांच्यावर खोटे आरोप करत आहेत.मात्र त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मागील दीड वर्ष अनिल देशमुख हे शांत बसले होते, आणि आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघ उपलब्ध नसल्यामुळे श्री फडणवीस यांच्या विरोधात लढता यावे म्हणून ते खोटे आरोप करून मिडियाचे लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत असेही आशीष देशमुख म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT