Anil Deshmukh
अनिल देशमुख file photo
नागपूर

Maharashtra politics : अजितदादांची घरवापसी शरद पवारच ठरविणार : अनिल देशमुख

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : अजित पवार यांच्या घरवापसीबाबत पक्षात सर्वंकष चर्चा होईल. अंतिम निर्णय मात्र शरद पवार हेच घेतील, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून इनकमिंग सुरू असलं तरी सरसकट कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यांची पडताळणी केली जाईल. नगरसेवकांपासून सुरू झालेले इनकमिंग आता आमदारांपर्यंत जाणार आहे. भाजपचेही आमदार यामध्ये आहेत, असा दावाही देशमुख यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात स्थान; मात्र कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच त्यांना पक्षात घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे खा. शरद पवार यांनी सांगितले होते. याबाबत विचारले असता अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि इतरही पक्षातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजपमध्ये असलेल्यांची खूप नाराजी आहे. कारण एकनाथ शिंदे, अजितदादा गटाच्या लोकांना मंत्रिपद मिळाली. १०५ आमदार असूनही भाजपचे अनेक निष्ठावंत नाराज आहेत. इतर सर्व पहिल्या पंगतीत मग आम्ही उपाशी का? असा सवाल त्यांच्या आमदारांचा आहे. त्यामुळे शरद पवार बोलले त्याप्रमाणे इतरांसाठी दरवाजे खुले आहेत, मात्र पक्ष फोडून स्वतंत्र पक्ष तयार करणारे, लोकसभा लढवणारे आणि आता विधानसभेच्या तयारीला लागणारे नेते, आमदार या संदर्भामध्ये पक्षात चर्चा होईल. सर्वानुमते निर्णय झाल्यानंतर स्वतः शरद पवार अंतिम निर्णय घेतील. अजित पवार स्वतः चा पक्ष वाढवत आहेत. त्यांच्या प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार असून एकत्रित बसून समन्यायी जागावाटप केले जाईल. नागपूर शहरातील दोन व ग्रामीणमध्ये देखील दोन जागांची आम्ही मागणी केली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT