नागपूर - शुक्रवारी रुपेरी पडदा गाजविणारे प्रसिद्ध अभिनेते मनोजकुमार आणि मूळचे नागपूरकर असलेले प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या अकाली निधनाने सारेच हळहळले. डॉ. विलास उजवणे यांच्या नागपुरातील विविध आठवनींना उजाळा मिळाला. त्यांनी नागपुरात बीएएमएस केले. नाट्यक्षेत्रात ते सतत कार्यरत होते. कॉलेजमधील नाटकांसह त्यांनी स्थानिक रंग स्वानंद तसेच इतर नाट्यसंस्थांच्या माध्यमातून राज्य नाट्य स्पर्धेत बालनाट्यांमध्ये आपला ठसा उमटविला. व्यावसायिक अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी ते आधी पुण्याला नंतर मुंबईला गेले.
दमदार आवाज, उत्तम अभिनय मनमिळाऊ स्वभाव तसेच कामांबद्दलची शिस्त याद्वारे त्यांनी आपली ओळख निर्माण केली अधूनमधून ते नागपूरला देखील येत असत.
कॉलेज तसेच रंग स्वानंद संस्थेच्या विविध नाटकातून आम्ही सोबत काम केले. नागपुरातील तालमींमध्ये त्यांनी गिरवलेले धडे त्यांना मोठे करून गेले. मुंबईत त्यांनी आपल्या परिश्रमाने सोने केले. यशस्वी अभिनेता म्हणून मान मिळाला. साधा सरळ व्यक्ती, जुन्या मित्राला आपण मुकलो अशी संवेदना रंग स्वानंदचे किशोर आयलवार यांनी व्यक्त केली. २०१७ पासून ब्रेन स्ट्रोक, हृदयविकार, कावीळ अर्धांगवायू अशा विविध आजारांशी त्यांचा संघर्ष सुरू होता. २०२२ मध्ये पुन्हा एकदा ते चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यास सज्ज झाले.
गतवर्षी नागपूर नजीकच्या बुटीबोरीजवळ एका चित्रपटाच्या चित्रीकरणातही डॉ. विलास उजवणे सहभागी झाले होते. नागपूरमधील कलावंत, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. एकपाठी असलेल्या या अभिनेत्याने दिवसभर नाटकाची तालीम करून सायंकाळी प्रयोग सादर केल्याची आठवण प्रसिद्ध रंगकर्मी संजय भाकरे यांनी सांगितली. नागपुरात होणाऱ्या नाट्य स्पर्धांमध्ये डॉ. उजवणे यांचे नाटक नेहमी पहिल्या तीन क्रमांकात असायचे, असेही ते म्हणाले. अत्यंत साधा आणि सरळ माणूस म्हणून त्यांची ओळख होती, असे दिग्दर्शक सलीम शेख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार डॉ प्रवीण डबली यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.