भारतीय सैन्यातील एका विवाहित जवानाने प्रेयसीचा गळा आवळून खून केला. Pudhari File Photo
नागपूर

प्रेयसीचा मृतदेह पुरून सिमेंट प्लॅस्टर केले; दृश्यम स्टाईल खून करणारा जवान मोबाईलमुळे जाळ्यात

Nagpur Murder Case | जंगलात मृतदेह पुरून त्यावर सिमेंटचे प्लास्टर

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : प्रेमात काय -काय आणाभाका घेतल्या जातात आणि नंतर डोक्यात सैतान संचारला की त्या आणाभाका, ती सोनेरी स्वप्ने कशी बेचिराख होतात. हे युवापिढीला दाखविणारी एक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. भारतीय सैन्यातील एका विवाहित जवानाने प्रेयसीचा गळा आवळून खून करीत मृतदेह जंगलात पुरला. इतकेच नव्हे तर त्यावर सिमेंटचे प्लॅस्टरही केले. कपडे जाळले आणि थांगपत्ता लागू नये, यासाठी तिचा मोबाईल फेकून दिला.(Nagpur Murder Case)

दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचे प्रेयसीपासून लपवले

ही खळबळजनक घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन या संशयित जवानाला अटक केली आहे.अजय वानखेडे (वय ३३, न्यू कैलासनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ज्योस्त्ना आकरे (वय ३२) असे मृत तरुणीचे नाव आहे. घटस्फोटीत ज्योत्स्ना टेलिकॉलर म्हणून नोकरीला होती. दुसऱ्या लग्नासाठी तिने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली, यातूनच तिची आरोपी अजयसोबत ओळख झाली होती. अजयने तिला प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचे वचन दिले. मात्र प्रत्यक्षात त्याने १९ मे रोजी दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. त्याने ज्योत्स्नापासून ही गोष्ट लपवून ठेवली.

२८ ऑगस्ट रोजी ज्योत्स्ना बेसा येथे तिच्या मैत्रिणीकडे गेली. मात्र त्यानंतर ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी फोनवर मैत्रिणीकडे विचारणा केली. यावेळी ज्योत्स्ना रात्री आठ वाजता फोनवर बोलण्यासाठी बगिच्यात गेली त्यानंतर ती परत आलीच नाही. असे तिच्या मैत्रिणीने सांगितले. दरम्यान, नातेवाईकांनी १७ सप्टेंबरपर्यंत तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र ती सापडली नसल्याने त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. याबाबत पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

मोबाईल ट्रेस झाला आणि संशयित जाळ्यात अडकला.

ज्योत्स्नाचा मोबाईल संशयित आरोपीने हैदराबादला गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकला होता. तो ट्रक काही दिवसांनी नागपुरात परत आला आणि ट्रकचालकाला हा मोबाईल दिसला. त्याने यातील सीम काढून आपले वेगळे सीम टाकले. तेव्हा पोलिसांना हा मोबाईल ट्रेस झाला. त्यांनी ट्रकचालकाची चौकशी केली असता, त्यांना मोबाईलबाबत माहिती मिळाली त्यामुळे तपासाची चक्र फिरली. आणि संशयित आरोपी जाळ्यात अडकला.

आरोपी अजयने ज्योत्स्नाला भेटण्यासाठी बोलविले , तिला कारमधून वारंगा येथील निर्जन स्थळी तो घेऊन गेला. तिची हत्या केली. पूर्ण कपडे निर्जन स्थळी जाळले व तिचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून पुरला. कुणाला संशय नको म्हणून पुन्हा सिमेंटने फ्लोअरिंगदेखील केले. तरुणीच्या मोबाईल सीडीआरवरून पोलिसांना ती बेपत्ता होण्याच्या वेळी शेवटचे अजयसोबत बोलल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पुण्याला गेला. मात्र मोबाईलमुळे सर्व प्रकार उघड झाल्याने अखेर त्याने गुन्हा कबूल करत तिचा मृतदेह पुरलेली जागा दाखविली. मध्यंतरी ज्योत्स्नाने मेडिकलमध्ये झालेल्या भेटीत अजयच्या आईला संपूर्ण प्रकार सांगितला होता आणि पोलिसांत तक्रार करेन असा इशारा दिला होता. यामुळेच अजयने काटा काढल्याचे कळते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT